पुण्यात भीषण अपघात, भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले
दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची घटना पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ घडली. या अपघातात दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यात मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री रात्री १२ ते १ च्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्याजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभवी रितेश पवार (वय एक), वैभव रितेश पवार (वय दोन ), रीनेश नितेश पवार, (वय ३०) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय २१) रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन भोसले (वय ९), नगेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८), आलिशा विनोद पवार (वय ४७) अशी जखमींची नावे आहेत.
डंपर चालक गजानन शंकर तोटे (वय २६, रा. नांदेड) यास अटक करण्यात आली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. रविवारी रात्रीच ते अमरावती येथून बिगारी व मजुरी कामासाठी वाघोली येथे आले होते. एका कुटुंबातील १२ जण फूटपाथवर झोपले होते. तर आणखी काही जण फूटपाथच्या बाजूला झोपड्यांमध्ये झोपले होते. यातील काही जण हे बाहेरील राज्यातील आहे. मद्यधुंद डंपर चालक तोटे यास अटक करण्यात आली आहे.