ब्रेकिंग! अजितदादांच्या राष्ट्रवादीत भूकंप
मंत्रिमंडळातून डावलले गेल्याने छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. मंत्रिपद कुणामुळे मिळाले नाही याचा थेट खुलासा त्यांनी केला नसला तरी त्यांचा रोख राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आहे, हे आता लपून राहिलेले नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भुजबळ यांच्यातील दुरावा वाढतच चालला आहे. यातच आज भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ या दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती भुजबळ यांनी माध्यमांना दिली.
भुजबळ म्हणाले, मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी सांगितले बऱ्याचशा गोष्टी. मी वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. आपण मान्य केले पाहिजे की, महायुतीला जो विजय मिळाला त्यामागे ओबीसींचे पाठबळ लाभले. त्यांचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल आभार मानले पाहिजे. त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी मला आहे. त्यांचे नुकसानही होऊ देणार नाही. पण आता राज्यात जे काही सुरू आहे. वेगळे वातावरण आहे. आठ =दहा दिवस मला द्या. नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू. राज्यातील ओबीसी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही निरोप द्या की मी यावर विचार करतोय. शांततेने घ्या. दहा बारा दिवसांत निर्णय घेऊ, असे फडणवीस म्हणाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतर भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहेत.
दिल्लीत भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. भुजबळ आजच शहा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भुजबळ कोणता निर्णय घेणार आहेत, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.