ब्रेकिंग! भुजबळ नाराज अन् अजितदादा 24 तासांपासून नॉट रिचेबल
राज्याच्या राजकारणात सध्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना आणखी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. ही बातमी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबंधित आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीनाट्य सुरू असतानाच ही बातमी आल्याने खळबळ उडाली आहे. अजितदादा नॉट रिचेबल झाले आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी अजितदादा गैरहजर राहिले. त्यामुळे अजिदादा नेमके गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंत्रिपद मिळाले नाही म्हणून भुजबळ नाराज आहेत. अधिवेशन सोडून नाशिकला रवाना होणार असल्याची माहिती आहे. येथे येऊन समता परिषदेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी भुजबळ चर्चा करणार आहेत. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज असल्याचे त्यांनी कालच सांगितले होते. इतकेच काय तर पक्षप्रमुख अजितदादा यांनाही काहीच बोललो नसल्याचे भुजबळ म्हणाले होते.
या घडामोडी घडत असतानाच अजितदादाही संपर्काच्या बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. मागील चोवीस तासांपासून अजितदादा पवारांचा कुणाशीही संपर्क झालेला नाही. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र आजही अजितदादा हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजितदादा कुठे गेले आहेत, याचे उत्तर त्यांच्या आमदारांकडूनही दिले जात नसल्याने सस्पेन्स वाढला आहे.