ब्रेकिंग! खासगी रुग्णालयात मध्यरात्री भीषण अग्नितांडव
देशातील विविध भागात अलीकडे आगीच्या दुर्घटनेचे प्रमाण वाढत आहेत. दरम्यान, तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात काल रात्री भीषण आग लागली. येथील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत काही रुग्णांचा होळपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीचे दृश्य भयावह होते. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिची रोडवरील सिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली. रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी रुग्णालयाला आग लागली, तेव्हा रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू होते.
आगीच्या घटनेनंतर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. रुग्णालयात आगडोंब उसळला असताना रुग्णालयात अनेक रुग्णांवर उपचार सुरू होते. यावेळी बचाव दलाने यातील २९ रुग्णांना बाहेर काढले.