बिजनेस
लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार सात हजार रुपये
- केंद्र सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यातच आता केंद्र सरकारने नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव विमा सखी असे असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची जबरदस्त संधी असणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षांत दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार असून योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण दहावीपर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. तसेच महिलेचे किमान वय अठरा वर्षे पूर्ण असायला हवे.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर देखील संधी दिली जाईल.
- मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून सात हजार रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार केली जाईल. तर तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम पाच हजार रुपये होईल. महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमीशनही दिले जाईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल.