राज्यात पावसाने उडवली दाणादाण!

राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भासह अन्य जिल्ह्यांत तुफान पाऊस होत आहे. आता आणखी तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा नवा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आज सकाळीही पाऊस होतच आहे. आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवातही पावसाची हजेरी राहील, असा अंदाज दिसत आहे.
राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत तीन ते चार दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुक्काम कायम आहे. आताही हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तसेच घरात पाणी शिरले आहे.



