महाराष्ट्र
शपथविधी होताच राजकीय वर्तुळात खळबळ

- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्यासाठी सध्या राज्यातील नेते मंडळींची रिघ लागली आहे. सत्ताधारीच नाहीतर विरोधी पक्षांतील नेतेही त्यांची भेट घेत आहेत. अशातच शरद पवार गटाचे नेते माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी काल फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
- पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. पवारांनी त्यांना इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अजितदादा गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी पुन्हा एकदा पाटील यांचा पराभव केला. भरणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
- पाटील म्हणाले, आज फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे आणि अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे अभिनंदन. आपल्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाली बनेल या सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील हीच अपेक्षा. त्यांना उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा, अशी पोस्ट पाटील यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.