मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचे नाव मीच सुचवले, कारण…

महायुती सरकारचा शपथविधी काल पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या.शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार मानले. तसेच मी आधी सीएम होतो, म्हणजे कॉमन मॅन होतो, आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन आहे, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यावर उपस्थित नेत्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला. हे सर्वसामान्यांचे सरकार असून राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे आहे. हे बाळासाहेबांच्या विचाराचे, सर्व जनतेला सोबत घेऊन जाणारे आणि सर्वांना न्याय देणारे सरकार असल्याचे शिंदे म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव फडणवीस यांनी सुचवले होते. आता मुख्यमंत्रीपदासाठी मी फडणवीस यांचे नाव सुचवले. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास वेगाने होईल, असे शिंदे म्हणाले.