राजकीय
सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अमित शहा यांनी स्पष्टच सांगितले
- सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, भाजपने आज विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संकल्पपत्र असे या जाहीरनाम्याचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले आहे. या संकल्पपत्रात तब्बल २५ वचने भाजपने दिली आहे. यावेळी सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याचे संकेत शहा यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना सोबत घेणार का ? या पत्रकारांच्या प्रश्नाला देखील शहा यांनी उत्तर दिले आहे.
- मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा निवडणुकीनंतर ठरवण्यात येईल. याबाबत तिन्ही पक्ष निर्णय घेतील. सध्या राज्यात महायुती सरकार असून याचे नेतृत्व हे एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील, असे शहा म्हणाले.
- शहा म्हणाले, शरद पवार यांनी राज्यासाठी काय केले. तुम्ही केंद्रात दहा वर्ष मंत्री होता. तब्बल २००४ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही काय केले. जेव्हा राज्यात व केंद्रात दोन्हीकडे तुमची सत्ता असतांना राज्यासाठी काय केले? आमची सत्ता असताना राज्याला आम्ही मोठा निधी दिला. याचे आकडे सर्वश्रुत आहेत.
- शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ठाकरे तुम्ही रामजन्मभूमीचे नेते आहात. मात्र, तुम्ही विरोध करणाऱ्यांसोबत आज बसले आहात. तुम्ही सावरकरांना विरोध करणाऱ्यांसोबत असून ते सीएए-यूसीसीला देखील करतात. २०१९ मध्ये राज्यातील जनतेने आम्हाला कौल दिला होता. मात्र, काही लोकांनी आम्हाला धोका दिला. मात्र, सत्तेत ते फार काळ टिकू शकले नाहीत. मी उद्धव यांना विचारतो की, सावरकरांबद्दल राहुल गांधीना दोन शब्द चांगले बोलायला तुम्ही लावू शकाल का ? काँग्रेसच्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल दोन शब्द चांगले बोलायला लावाल का ?