सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट

  • तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) सोलापूर शहरातील पदाधिकार्‍यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, माजी महापौर महेश कोठे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असून उद्यापासून (सोमवारी) सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष प्रचारात सक्रीय सहभाग नोंदविणार असल्याची घोषणा बीआरएसचे शहराध्यक्ष दशरथ गोप व पक्षाचे ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ यांनी पत्रकार परिषदेत केली. 
  •  भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली. भारत राष्ट्र समिती पक्षाचे उमेदवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात समविचारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही दिली. त्यांच्याकडून होकार आल्यानंतर स्थानिक पातळीवर आम्ही आमची भूमिका जाहीर करून महेश कोठे यांना पाठिंबा दिला असल्याचे गोप यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेस जयंत होले-पाटील, संदीप वल्याळ, व्यंकटेश आकेन, श्रीधर चिट्याल उपस्थित होते.
  • सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी भाजपच्या निष्क्रिय आमदाराने सोलापूर शहराला विकासात मागे नेले. मतदारसंघ व शहराच्या विकासासाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळेच आम्ही विकासाची धमक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून या निवडणुकीत आम्ही महेश कोठेंची ताकद बनून काम करणार आहोत, असेही भारत राष्ट्र समितीचे शहराध्यक्ष दशरथ गोप व नागेश वल्याळ यांनी सांगितले. दरम्यान, आगामी महापालिकेत बीआरएस स्वबळावर लढणार असल्याचा नाराही या नेत्यांनी दिला.

Related Articles

Back to top button