दिवाळीच्या फराळातून पैसे वाटल्याचा आरोप
विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या गाठीभेटी व फराळाच्या माध्यमातून नेतेमंडळीही ग्रामस्थांपर्यंत पोहोचत आहेत. अशातच रोहित पाटील उमेदवार असलेल्या कवठेमहंकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केली आहे. मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील (वय-48) आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम (वय-35) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव येथील साठेनगर भागात रोहित पाटील यांची पदयात्रा सुरु होती. या पदयात्रेच्या पाठीमागे पाटलांचे काही कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून पैसे वाटताना दिसून आले. यानंतर अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी या रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना पकडून त्यांना पोलीस ठाण्यात आणले.