राजकीय
शरद पवार-एकनाथ शिंदेचं काहीतरी चाललंय, निकालानंतर…
- गेल्या पाच वर्षांत राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. दोन सरकारे आली. त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडून चार पक्ष झाले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहेत. त्यातच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठा दावा केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे संपर्कात आहेत, असा दावा मलिक यांनी केला आहे. तर निवडणुकीनंतर काहीही होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
- एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी वेगवेगळे विधान केले आहे. निवडणुकीनंतर भाजपचेच सरकार येईल किंवा अजितदादा भाजपबरोबरच असतील हे आताच सांगणे कठीण आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे आता सांगू शकत नाही. आता काही लोक सांगत आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा राज्यात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे, असे मलिक यांनी सांगितले.