एक राजकीय सल्ला देण्यासाठी प्रशांत किशोर किती कोटी घेतात शुल्क?

निवडणुकीचे अचूक गणित ठरवत राजकारणात आलेले जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ज्यावेळी मी निवडणुकीची रणनीती ठरवत होतो तेव्हा कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फक्त एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी शंभर कोटींपेक्षा जास्त शुल्क घेत होतो.
सध्या देशातील दहा राज्यांत त्यांच्या सल्ल्यानुसार बनलेले सरकार कार्यरत आहे असा त्यांनी दावा केला. बिहारमधील पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान किशोर यांनी हा खुलासा केला. तेरा नोव्हेंबर रोजी बिहारमधील चार मतदारसंघांत पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच किशोर यांचा पक्ष आहे.
बेलागंज, इमामगंज, रामगढ आणि तरारी या चार मतदारसंघात किशोर यांनी उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. ३१ ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर यांनी बेलागंज येथे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला.
यावेळी किशोर म्हणाले, मला नेहमीच विचारले जाते की, अभियानासाठी पैसे कुठून आणले जातात. याचे उत्तर देताना किशोर म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष असो किंवा नेता यांना निवडणुकीत सल्ला देण्यासाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त फी घेत होतो.
माझ्या सल्ल्यानुसार देशातील दहा राज्यांत सरकार आहे. तर मग आम्हाला अभियानासाठी तंबू लावण्यासाठी पैसे मिळणार नाहीत का? आम्हाला इतके कमजोर समजण्याचे काय कारण? आम्ही एका निवडणुकीत सल्ला देतो तर आमची फीसुद्धा शंभर कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्तच असते, असे किशोर म्हणाले.