महाराष्ट्र
बाप रे! पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला
- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधासभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून तपासण्या देखील सुरु झाल्या आहेत. निवडणुकीच्या काळात पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी कडक नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. असे असताना पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान 138 कोटींचे सोने पकडले आहे. आज सकाळच्या सुमारास सातारा रस्त्यावर ही कारवाई पोलिसांनी केली आहे.
- पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पुणे पोलिसांनी एका संशयित वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये हे सर्व सोन्याचे दागिने सापडले आहे. मात्र, हे सोने नेमके आले कुठून, कुठे जात होते? कोणाचे होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली असून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.