मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. दरम्यान राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे नाव चांगलेच चर्चेत आहेत. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आंदोलने, उपोषण, सरकारसोबत चर्चा त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा या सगळ्यांमुळे ते घरांघरांत पोहोचले आहेत.
दरम्यान आता जरांगे यांच्या प्रकृतीविषयी अपडेट समोर आले आहे. जरांगे यांनी ऐनवेळेस विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनंतर राजकीय वर्तुळातून अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. जरांगे मात्र याकडे लक्ष न देता गावोगावी जावून मराठा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत चर्चा करत आहेत. दरम्यान लासलगावमध्ये जरांगे यांनी केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. यावेळी जरांगे यांनी स्वत:च्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे.
मराठा समाजाच्या लोकांसोबत बोलताना जरांगे म्हणाले की, मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. माझे शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये, माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये, अशी इच्छा जरांगे यांनी व्यक्त केली.
यावेळी ते म्हणाले की, मला दर आठ ते पंधरा दिवसांनी सलाईन घ्यावे लागते. हे शरीर आहे, कधी जाईल माहिती नाही. मी तुमच्यात किती दिवस राहील, हे मला माहित नाही.
जरांगे पुढे म्हणाले की, मी अनेक उपोषणे केलेली आहेत. त्यामुळे मला चालताना, चढताना-उतरताना देखील खूप त्रास होतोय. शरीर कधी धोका देईल, हे सांगता येत नाही.