ब्रेकिंग! अजितदादांचा धुमधडाका
विधानसभा निवडणुकीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी होताना दिसत आहेत. या राजकीय घडामोडींचे केंद्र नांदेड आणि सांगली ठरू लागले आहे. जागावाटपात युती अन् आघाडीत अनेक मतदारसंघांची अदलाबदल झाली आहे. त्यामुळे इच्छुकांना पक्षांतर करणे भाग पडत आहे. यामध्ये राजकारणातील चर्चित चेहरेही आहेत. नुकत्याच पक्षांतराच्या दोन मोठ्या घटना आज सकाळी घडल्या.
माजी खासदार संजय काका पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर या भाजपच्या माजी दोन खासदारांनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या दोन्ही माजींनी घड्याळ हातात घेताच त्यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला आहे. महायुतीतील पक्षातच हा प्रवेश झाल्याने निवडणुकीत याचा फटका बसणार नाही असा दावा केला जात असला तरी यानिमित्ताने अजितदादा यांनी भाजपचे दोन खासदार फोडलेच आहेत.
सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ या मतदारसंघातून शरद पवार गटाने दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न अजितदादा गटासमोर होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी आज सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर तासगाव मतदारसंघात संजय पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत ठरली आहे.
चिखलीकर यांनीही आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यात प्रताप पाटील चिखलीकर मातब्बर नेते म्हणून परिचित आहेत.