क्राईम
ब्रेकिंग! बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोईच्या गँगकडून नाही?
- माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. या खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा कोणताही हात नसल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभम लोणकर ऊर्फ शुब्बू याने लॉरेन्स बिश्नोई या नावाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच सिद्दीकी प्रकरणात बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले. मात्र, बिश्नोईने या हत्येची सुपारी घेतली नसावी, असा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याचे कारण म्हणजे बिश्नोईशी संबंधित कोणत्याही विशिष्ट व्यक्तीने अद्याप याची जबाबदारी घेतली नाही. बिश्नोई टोळीने जेव्हा जेव्हा काही केले आहे, तेव्हा त्याच्याशी संबंधित लोकांनी ते उघडपणे स्वीकारले आहे किंवा सरळ-सरळ नाकारले आहे, असे याआधीचे रेकॉर्ड सांगते.
- बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. मुंबई गुन्हे शाखा त्याची चौकशी करण्यास असमर्थ आहे. अशा तऱ्हेने सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना बिश्नोईचा या प्रकरणात सहभाग असल्याची खात्री नाही. आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तर यांनी स्वत: सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. सिद्दीकी यांच्या हत्येमागे झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा कारणीभूत असावा, असाही पोलिसांना संशय आहे.
- पोलीस या प्रकरणी अजूनही विविध शक्यता गृहित धरून तपास करत आहेत. बिश्नोईशी संबंधित दोन-तीन खास व्यक्तींच्या अद्याप काही प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत. मग तो बिश्नोईचा भाऊ अनमोल असो, त्याचा साथीदार रोहित गोदारा असो किंवा कॅनडात राहणारा गोल्डी ब्रार असो. सिद्दीकी हत्या प्रकरणात सर्वांनी मौन बाळगले आहे. आतापर्यंत असे घडले नव्हते. हे लोक एखाद्या प्रकरणात आपला सहभाग आहे की नाही, याचा दावा करत होते. पण आत्तापर्यंतच्या मौनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.