सुशीलकुमार शिंदेंनी ‘ती’ चूक केली मान्य
काँग्रेस प्रणित यूपीए शासन काळात भगवा दहशतवाद हा शब्द काँग्रेसी गृहमंत्र्यांनी कॉइन केला. त्यामध्ये पी. चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे यांचा सहभाग होता. पण आता सुशीलकुमार शिंदे यांना उपरती झाली असून भगवा दहशतवाला शब्द वापरायला नको होता.
कारण भगवा, लाल, पांढरा असे कुठलेही दहशतवाद नसतात. दहशतवाद हा दहशतवाद असतो, असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी youtube वर दिलेल्या एका मुलाखतीत केले. याच मुलाखतीत सुशीलकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हार्ड वर्कची स्तुती केली.
2008 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी भगवा दहशतवाद हा शब्द वापरला होता. मालेगाव बॉम्बस्फोटाचा संदर्भ त्यांनी त्यावेळी केला होता. त्यामुळे तो शब्द गृहमंत्रालयाच्या रिपोर्ट मध्ये सामील झाला होता. 2012 मध्ये सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना त्यांनी भगवा दहशतवाद या शब्दाचा पुनरुच्चार केला होता.
पण त्याची राजकीय किंमत काँग्रेसला फार मोठी चुकवावी लागली. काँग्रेस सत्तेवरून घसरलीच, पण 44 खासदारांपर्यंत येऊन ठेपली होती. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे खासदार जरूर वाढले, पण आजपर्यंत काँग्रेस सत्तेवर येऊ शकलेली नाही.
सुशीलकुमार शिंदे यांनी “फाईव डेकेड्स इन पॉलिटिक्स” हे आत्मचरित्रपर लेखन केले, त्यावर आधारित मुलाखत देताना सुशीलकुमार शिंदे यांना मुलाखतकाराने भगवा दहशतवाद या विषयावर प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी वर उल्लेख केलेले उत्तर दिले. काँग्रेसचे काही धोरण होते.
त्याचवेळी गृह मंत्रालयाच्या रिपोर्ट्समध्ये भगवा दहशतवाद हा शब्द आला होता. त्यामुळे तो शब्द वापरला गेला, पण प्रत्यक्षात भगवा, लाल किंवा पांढरा दहशतवाद असे काही नसते. त्यामुळे भगवा दहशतवाद शब्द वापरायला नको होता, अशी कबुली सुशीलकुमार यांनी दिली.