ब्रेकिंग! सोन्याच्या व्यापाऱ्याला बिश्नोई गॅंगच्या नावाने धमकी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यापासून राज्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव चर्चेत आहेत. या टोळीच्या नावाने धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार राज्यात घडू लागले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला बिश्नोई टोळीच्या नावाने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या व्यावसायिकाला धमकीचा एक ई मेल आला असून या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार काल उघडकीस आला. त्यानंतर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली. बिश्नोई टोळीला दहा कोटींची खंडणी दिली नाही तर बाबा सिद्दीकीप्रमाणे अवस्था करू. खंडणीची रक्कम कधी आणि कशा प्रकारे द्यायची यासाठी दुसरा मेल पाठवून देऊ, असे यात म्हटले आहे. पोलिसांनी ई मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. धमकीचा ई मेल पाठवणारा पुणे शहर परिसरातील असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा ई मेल सायबर गुन्हेगारांनी पाठवला की बिश्नोई टोळीकडून आला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.