राजकीय

दाऊदबरोबर संबंध असल्याचा आरोप, नंतर जेलवारी

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने मुंबईत दोन उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. हे दोन्ही उमेदवार दुसरे तिसरे कोणी नसून नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक हे आहेत. हे दोघे जण जरी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असले तरी लेकीसाठी नवाब मलिक हे आपला पारंपारिक मतदारसंघ सोडणार आहेत. त्यांनी नव्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादा पवारांच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार आहे. तर महायुतीत भाजपला नवाब मलिक यांच्याबरोबर सना यांचाही प्रचार करावा लागणार आहे.

नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते विद्यमान आमदारही आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री ही होते. मात्र दाऊद इब्राहिम बरोबर संबध असल्याच्या आरोपावरून त्यांना जेलवारी करावी लागली होती. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर होते. त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतरही त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतली नाही. सध्या ते अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना पक्षात घेऊ नये, असे पत्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लिहीले होते. मात्र त्याकडे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले होते.

आता त्याच्या एक पाऊल पुढे जात अजितदादा यांनी नवाब मलिक यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. ऐवढेच नाही तर नवाब मलिक यांच्याबरोबर त्यांची मुलगी सना यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. त्यामुळे ज्या मलिकांना भाजपने, शिंदे गटाने टोकाचा विरोध केला, त्यांचा प्रचार करण्याची वेळ या दोन्ही पक्षांवर येणार आहे. मात्र महायुतीतील हे पक्ष मलिक पिता -पुत्रीचा प्रचार करतात की नाही, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button