राजकीय

ब्रेकिंग! महायुतीत राजकीय भूकंप

राज्यात सत्ता राखण्यासाठी सर्व आघाड्यांवर मोर्चेबांधणी करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. २०१४ पासून ते युतीसोबत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदही देण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून त्यांनी परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 

मात्र, त्यांचा पराभव झाला. जानकर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारात घेतले जात नाही, अशी त्यांची तक्रार होती. महायुतीच्या नेत्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली. अखेर त्यांनी वेगळी वाट धरली आहे. 

सोलापूर, अहिल्यानगर, बारामती, इंदापूर, कर्जत-जामखेड, मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना अशा जिल्ह्यांत जानकर यांच्या रासपचा चांगला प्रभाव आहे. मराठा, ओबीसी, आदिवासींच्या आरक्षण प्रश्नामुळे राज्यात सध्या सामाजिक तणाव आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे

त्याचे पडसाद राज्याच्या निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. अशावेळी धनगर समाजाचा चेहरा दूर जाणे महायुतीला परवडणारे नाही. रासप स्वतंत्र लढल्यास महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button