सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केले महत्त्वाचे आवाहन

सोलापूर :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या क्षणापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यंत सतर्क राहून करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व शासकीय विभाग प्रमुखाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शासकीय इमारत, कार्यालय त्या ठिकाणी राजकीय व्यक्तींचे छायाचित्रे, नावे असतील तर ते तात्काळ झाकून ठेवण्याची कार्यवाही करावी अथवा काढून टाकावे. संपूर्ण जिल्ह्यात राजकीय व्यक्तींचे पोस्टर्स बॅनर्स व अन्य राजकीय मजकूर असेल तर तोही काढून टाकावा व त्याचा अहवाल 24 तासात जिल्हा प्रशासनाला सादर करावा. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी त्यांच्याकडे असलेली पदाधिकारी यांची वाहने तात्काळ निवडणूक प्रशासनाकडे जमा करावीत. आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यंत काटेकोरपणे होईल याबाबत दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

ज्या कामांचे टेंडर प्रक्रिया झालेली आहे परंतु कामे सुरू झालेली नाहीत अशी कामे अजिबात सुरू करू नयेत. तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी त्यांचे टेंडर नोटीस चे रजिस्टर लाल शाहीने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी मार्क करून त्याची माहिती प्रशासनाला सादर करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आचार संहितेच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल प्रशासनाला त्वरित सादर करावा. आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे अशी कोणाचीही तक्रार येण्यापर्वी अत्यंत दक्ष राहून सर्व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केले. यावेळी पोलीस आयुक्त एम. राज, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही आचारसंहितेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. 

Related Articles

Back to top button