क्राईम

मित्रानेच केले मित्राचे अपहरण!

  1. सध्याची तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे. नशा करण्यासाठी ही तरुणाई काहीही करण्यास तयार असून यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अशीच एक घटना उघडकीस आली असून नागपूर येथील एका नशेबाज मित्राने नशा करण्यासाठी आपल्याच मित्राचे अपहरण करून त्याला त्याचे अर्धनग्न फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच त्याच्या वडिलांना मारण्याची धमकी आरोपीने दिली आहे.
  2. हर्षल राजेश शाहू (वय १९, बाळकृष्णनगर), प्रयाग रविंद्र मेश्राम (वय १९, मुद्रानगर, मानेवाडा) व अल्पवयीन मुलगा असे आरोपी असून त्यांच्यावर अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा हा नागपूर येथील नरेंद्रनगर परिसरात राहतो. १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तो त्याच्या घरच्यांसोबत नरेंद्रनगरातील लक्षवेध मैदानात गरबा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचे आई, वडील घरी परतले. तर तो त्याच्या मित्रांसोबतच तेथेच थांबला.
  3. रात्री १२.३० च्या सुमारास त्याचे जुने मित्र हर्षल, प्रयाग व अल्पवयीन मुलाने त्याला बोलायचे आहे, असे म्हणत कार जवळ नेले. त्यांनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेले. त्यांनी त्याला मारहाण करत त्याचे कपडे काढले. त्याचा व्हिडिओ तयार करत तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याला दिली. तसेच नशा करण्यासाठी पाच हजार रुपये आरोपीने मुलाला मागितले. पैसे न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
  4. यावेळी मुलाने त्याच्या जवळील तीन हजार रुपये त्याला दिले. तसेच त्याने दुसऱ्या मित्राला फोन करून गुगलपेने पैसे मागवून घेतले. यानंतर आरोपींनी जर हा प्रकार पोलिसांना सांगितला तर मुलाला व त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याला अर्धनग्न अवस्थेत नरेंद्रनगर परिसरातील अग्निशमन विभागाच्या कार्यालयाजवळ सोडले. यानंतर त्याने त्याच्या सोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी मुलाला घेऊन थेट अजनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. तर तिसऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या हवाली केले आहे.

Related Articles

Back to top button