महाराष्ट्र
चुकीला माफी नाही!
- विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला दणका देत महायुती राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. सरकारचा पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. तर दुसरीकडे आता विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांवर काँग्रेस कारवाई करणार आहे.
- माहितीनुसार, आतापर्यंत काँग्रेसने काही नेत्यांना नोटीस देखील पाठवली आहे तर पुढील काही दिवसात आणखी काही नेत्यांना नोटिसा पाठवले जाणार आहेत. माहितीनुसार दिल्लीतील काँग्रेस नेते महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर नाराज असून पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस कधी आणि किती नेत्यांवर कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
- काँग्रेसने अशा स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत, ज्यांच्या विरोधात निवडणुकीमध्ये पक्षा विरोधात काम करण्याच्या तक्रारी आल्या आहेत. राज्यातील 20 पेक्षा जास्त ठिकाणांहून पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी काँग्रेसकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांना नोटिसा पाठवल्या जाणार आहेत.