क्राईम
अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा खून

- राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर घराशेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीनेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, संस्कृती रामचंद्र जाधव असे खून झालेल्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी संस्कृती अचानक राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. ती कुठे गेली, याची कुणालाच काही कल्पना नव्हती. तिचा घरच्यांनी आसपासच्या परिसरात सगळीकडे शोध घेतला, पण ती रात्री उशिरापर्यंत सापडली नाही. शेवटी कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
- पोलिसांनी घटनास्थळी रात्रभर ड्रोनद्वारे संस्कृतीचा शोध सुरू केला. सातारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडू- पाटील, उपपोलीस अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस पथकाने श्वान पथकाच्या मदतीने रात्रभर शोध सुरू घेतला. दरम्यान, आज पहाटे पाच वाजता मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मयत संस्कृतीच्या घराशेजारी राहणारी मुलगीच तिला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आले.
- त्यावरून पोलिसांनी एका १६ वर्षीय मुलीसह आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आता ही हत्या नेमकी कशामुळे झाली? यामागे नक्की कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे.