क्राईम
पुण्यातील कुख्यात गुंडावर हल्ला

- धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाला आहे. घायवळ हा धाराशिव जिल्ह्यात एका गावच्या यात्रेत उपस्थित होता. त्यावेळी एका पैलवानाने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. कुस्तीच्या फडात हा हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भूम तालुक्यातील आंदरुड गावाच्या यात्रेत ही घटना घडली.
- आंदरुड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निलेशनेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. घायवळ स्वतः कुस्ती पाहण्यासाठी आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. नेमक्या याचवेळी एक पैलवान अचानक घायवळच्या अंगावर धावून गेला. त्याने घायवळला मारहाण केल्याची माहिती आहे. त्याने घायवळच्या श्रीमुखात भडकावली.
- अचानक घडलेल्या या प्रकाराने आजूबाजूचे सगळेच गोंधळले. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत हाणामारी सोडवली. घायवळच्या समर्थकांनी या पैलवानाला चांगलाच चोप दिला. घायवळला मारहाण करुन हा पैलवान आता फरार झाला आहे. पोलीस या पैलवानाचा कसून शोध घेत आहेत. या पैलवानाने अचानक हल्ला का केला, यामागे नेमकं काय कारण आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.