एकनाथ शिंदेंची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप सुधारणा झाली नसल्याचे समोर आले आहे.
डॉक्टरांनी शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज ८ ते १० सभा करत असल्याने प्रचंड धावपळ झाली होती. यातून थोडासा आराम करण्यासाठी दरे मुक्कामी आलो असून, आपली तब्येत बरी नसल्याचे शिंदे यांनी सांगितले होते.
दरम्यान शिंदे यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहेत. त्यातच अंगात तापही आहे. अशक्तपणा आल्यामुळे शिंदे यांना सलाईन लावण्यात आले. डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे जाणवत असल्यामुळे शिंदे यांची चाचणी करण्यात आली. शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज शिंदेंची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत नियोजित बैठक होणार होती. आता आजारपणामुळे शिंदे बैठकीला जाणार का? याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिंदे यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा नसल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.