क्राईम

ब्रेकिंग! बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी या नेत्याने फडणवीसांवर साधला निशाणा

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. खासकरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. आम आदमी पक्षाच्या (आप) एका नेत्याने देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र हा नेता आता स्वत:च ट्रोल झाला आहे. सोशल मीडिया यूजर्स आप नेत्याला त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपचे नेते आणि दिल्लीतील उत्तम नगरचे आमदार नरेश बल्यान यांनी दावा केला की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत ‘बदला पुरा’ या आशयाचे फडणवीसांचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यांच्या संमतीशिवाय हे होऊ शकते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बल्यान यांनी दोन बॅनर ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री, राजकारणी आणि उद्योगपती यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण मुंबईत महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले बॅनर आणि ‘बदला पुरा’चे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. याचा अर्थ समजायचा की, ही हत्या फडणवीसांनी घडवून आणलीय? गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे असे बॅनर त्यांच्या संमतीशिवाय संपूर्ण शहरात लावता येतील का? देश कोणत्या दिशेने चालला आहे? देवाने आता या देशाचे रक्षण करावे, असेही त्यांनी म्हटले.

बल्यान यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला असला तरी सोशल मीडिया यूजर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक युजर्सनी बल्यान यांच्या पोस्टला प्रतिसाद देत जुन्या घटनेला बाबा सिद्दिकी यांच्या हत्येशी जोडून चुकीचे चित्रण करत असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे. गृह मंत्रालय आणि मुंबई पोलिसांना टॅग करत वरुण गुलाटी नावाच्या युजरने लिहिले की, कृपया दखल घ्या, नेत्यांबद्दल चुकीची माहिती पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान बल्यान यांनी शेअर केलेले बॅनर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वीचे आहे. बदलापूरमध्ये दोन मुलींच्या लैंगिक छळाप्रकरणी आरोप असलेल्या अक्षय शिंदे हा 20 दिवसांपूर्वी पोलीस चकमकीत ठार झाला होता. या चकमकीनंतर मुंबईत काही ठिकाणी फडणवीस यांच्या छायाचित्रांसह ‘बदलापुरा’ असे बॅनर लावण्यात आले होते. हेच बॅनर नरेश बल्यान यांनी पोस्ट केले आहेत. त्यामुळे ते ट्रोल होत आहेत.

Related Articles

Back to top button