क्राईम

ब्रेकिंग! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता थेट…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री उशीरा हत्या करण्यात आली. या गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती चौकशीतून समोर येत आहे. दरम्यान, आज बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना किला कोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणी आता मुंबई गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, काल रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर उपस्थित होते. 

निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबार प्रकरणी सुरुवातीला निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

त्यानंतर या प्रकरणाचा तपास तातडीने गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. ही घटना घडल्यानंतर तिथे उपस्थित असणारे पोलीस अधिकारी एपीआय राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत तत्काळ घटनास्थळावरूनच दोन आरोपींना पकडण्यात यश मिळवले.

सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती का? असा प्रश्न नलावडे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, बाबा सिद्दीकी यांना कॅटेगराईज सुरक्षा नव्हती. पण त्यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस कर्मचारी तैनात होते. हल्ला झाला, त्यावेळी एक पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होता, अशी माहिती देत नलावडे म्हणाले की, गुन्हे शाखेकडून 15 पथक तैनात करण्यात आली आहेत. आम्ही या हत्येचा प्रत्येक अँगलने तपास करत आहोत. 

आम्हाला बाहेरच्या राज्यातील पोलिसांची मदत हवी असून ती घेतली जात आहे. टेक्निकल, ग्राऊंड इन्वेस्टीगेशन आणि इतर गोष्टींचा मदत घेऊन आम्ही तपास करत आहोत. लॉरेन्स बिश्नोई, सलमान खान किंवा इतर कुठला अँगल असेल त्या सर्व अँगलने आम्ही तपास करत आहोत. तसेच जी पोस्ट व्हायरल होत आहे, ती कितपत खरी आहे, याबाबतही आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती नलावडे यांनी दिली.

Related Articles

Back to top button