राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात काल रात्री मृत्यू झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हरियाणाचा कर्नेल सिंग ( वय 23 वर्षे) आणि उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप (वय अवघे 19) अशी आरोपींची नावे आहेत. यातील काही आरोपी हे बिश्नोई गॅंगचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
सिद्दीकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला. यातील दोन आरोपींची नावे ही करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आहेत. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हे तीनही आरोपी रिक्षाने घटनास्थळी आले होते. तीनही आरोपी सिद्दीकी यांची वाट पहात त्या ठिकाणी थांबले होते. या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष गोळ्या घालणाऱ्या तिघांव्यतिरिक्त आणखी एका आरोपीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा चौथा आरोपी तिघांना मार्गदर्शन करत होता.
केवळ 19 वर्षांचा धर्मराज अन् करनैल सिंहने वाजवला बाबा सिद्दीकींचा ‘गेम’

पोलिसांना तसा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. हे आरोपी मागील अनेक दिवसांपासून सिद्धीकी यांच्यावर पाळत ठेवत होते. या प्रकरणातील आरोपी करनैल सिंह बिश्नोई संबंधित असल्यामुळे हे प्रकरण वेगळे वळण घेत चालले आहे. कारण या हत्येप्रकरणातील आरोपी करनैल सिंह हा बिश्नोई संपर्कात होता.
करनैल सिंह हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 2019 मध्ये एका हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तुरुंगात असताना करनैल सिंह बिश्नोई गॅंगच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील बिश्नोई गॅंग कनेक्शन समोर आले आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी मुख्य सूत्रधाराने शूटर्सना एडवान्स पेमेंट दिले. त्यांना नेमके किती पैसे देण्यात आले, हत्या करण्यासाठी नेमके किती पैसे घेण्यात आले याची माहिती अद्याप पुढे आली नाही. शूटर्सना एक दिवसाआधी आर्म्स डीलरमार्फत कुरिअर एजंटच्या मदतीने पिस्तूल मिळाले. यासाठी त्यांना पैसे आधीच देण्यात आले होते.