सासू-सासऱ्याने काढला जावयाचा काटा

राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, कोल्हापूर बस स्थानकावर एक मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. सासू सासऱ्याने धावत्या बसमध्ये जावयाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर त्याचा मृतदेह हा स्थानकावर सोडून ते पसार झाले होते. या प्रकरणी सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
संदीप शिरगावे असे हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे. संदीप हा मूळचा शिरोळचा येथील रहिवासी आहे. बुधवारी मध्यरात्री संदीपची हत्या करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी कोल्हापूर बसस्थानकावर त्याचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत याप्रकरणी तपास सुरू केला. दरम्यान, सासू सासरे यांनी मिळून त्याचा खून केल्याचे उघड झाले.
संदीप हा बुधवारी रात्री गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला विनावाहक गाडीतून येत होता. यावेळी त्याच्या सासू सासऱ्याने गाडीतच त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह हा कोल्हापूर बसस्थानकावर आणून टाकून दिला होता.
संदीप याला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन पत्नी आणि मुलाला त्रास देत असे. त्याला समजावून सांगूनही त्याने पत्नीला मारणे सोडले नव्हते. यामुळे पत्नीचे आई, वडील संतापले होते. मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा काटा काढण्याचे त्यांनी ठरवले. बुधवारी रात्री तिघे जण गडहिंग्लजवरुन विना वाहन गाडीतून कोल्हापूर येथे येत होते. याचा फायदा त्यांनी घेतला. गाडीत रात्री सर्व झोपलेले असल्याची खात्री करून गाडीतच जावयाचा गळा दोघांनी आवळला. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह हा बस स्टँडवर नेऊन ठेवला.