बेरोजगार अन् बाहेर लफडं

राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या मालवणी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अॅसिड हल्ल्यात जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी पतीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
पीडित महिला आणि आरोपी यांचा 2019 मध्ये प्रेम विवाह झाला होता. लग्न झाल्यावर पीडित महिलेच्या लक्षात आले की, आपला पती कोणतीही नोकरी, कामधंदा करत नाही. पतीचे उत्पन्न काहीही नसल्याने पती-पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण झाली. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी पत्नीला लक्षात आले की, आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. यानंतर ही महिला मालाड येथे आपल्या माहेरी निघून गेली.
बेरोजगार पती आणि त्यासोबतच त्याचे विवाहबाह्य संबंध या सर्वांना वैतागून पत्नीने तलाक मागण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपल्या पतीकडे तिने तलाक देण्याची मागणी केली. मात्र, पत्नीने केलेल्या या मागणीमुळे पती चांगलाच संतापला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीवर कथितपणे अॅसिड फेकले.