क्राईम
ब्रेकिंग! एकीकडे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा थरार; दुसरीकडे राजकारण सुरु झाले

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षय याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात अक्षय याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली. परंतु आता पोलिसांनी केलेलं हे एन्काउंटर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. अक्षय याचे एन्काउंटर खरं की खोटं, असा सवाल कॉंग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
या एन्काउंटरनंतर राज्यात खळबळ उडाली असून विरोधी नेत्यानंतर पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना बदलापूर प्रकरणातील सरकारी वकील उज्जवल निकम यांनी म्हटले की, आरोपीवरील गोळीबार केल्याची घटनेची चौकशी केली जाईल.