ब्रेकिंग! कंटेनरने धडक दिल्याने स्विफ्ट कारचा चक्काचूर

राज्यात अलीकडे रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. भरधाव वेगात वाहने चालवल्यानेच जास्त अपघात होत आहेत. आताही असाच भीषण अपघात मराठवाड्यात घडला आहे. अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. या अपघातातील सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आली नाहीत. या मयतांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा जगलपूर येथील चौघे जण स्विफ्ट कारने छत्रपती संभाजी नगरकडे निघाले होते. रात्रीच्या वेळी या भागात जोरदार पाऊस सुरू होता. या पावसात समोरील काही दिसत नव्हते. ही स्विफ्ट कार अंबाजोगाई-लातूर रोडवर आली. त्यावेळी समोरून येणाऱ्या कंटेवर आणि या कारची जोराची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, कार थेट कंटेनरच्या खाली घुसली. कारमधील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला.