क्राईम
मित्रानेच केला मित्राचा खून

राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या दारुच्या व्यसनाविषयी आई आणि पत्नीला मित्र सांगत असल्याने घरात वाद होत. त्याच रागातून तरुणावर वार करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे.
हडपसर पोलिसांनी या प्रकरणात सोलापूरहून दोघांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी १२ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघड केला आहे. अमोल ऊर्फ भावड्या मारुती माने (वय ३९, रा. रामोशी आळी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वैभव गणेश लबडे (वय ३१, रा. हिंगणे आळी, हडपसरगाव) आणि ज्ञानेश्वर दत्तु सकट (वय २७, रा. रामोशी आळी, हडपसर) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा केटरिंगचे काम करत होता. तो एकटाच रहात होता. त्याची बहीण संगीता कुलकर्णी ही त्याला फोन करत होती. परंतु तो फोन उचलत नव्हता.
त्यामुळे तिने त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला अमोलच्या घरी पाठविले. तेव्हा त्या व्यक्तीला अमोल हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. याबाबत पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला.
परिसरातील सीसीटीव्ही व मिळालेल्या माहितीच्या आधारे वैभव याला हडपसर भागातून तर ज्ञानेश्वर याला सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खूनामागचे कारण समोर आले आहे.
अमोल आणि वैभव हे एकमेकांचे मित्र होते. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. अमोल हा वैभवला असलेल्या व्यसनाविषयी वेळोवेळी त्याच्या आईला व पत्नीला सांगत असे. त्यामुळे वैभव याचे त्याच्या आई व पत्नीबरोबर वाद होत असत.
अमोल हा वेळोवेळी त्याच्या नशेबद्दल सांगून आई व पत्नीला भडकवत असल्यामुळे वैभव याच्या मनात अमोलबाबत राग निर्माण झाला. या रागातूनच आरोपीने त्याचा खून केल्याची कबुली दिली. वैभव हा टेम्पोचालक आहे.
ज्ञानेश्वर हा अमोल याच्याजवळ राहतो. वैभव व ज्ञानेश्वर यांनी लोखंडी रॉड अमोल याच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. त्यानंतर ज्ञानेश्वर हा पळून गेला होता. पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून ताब्यात घेतले.