क्राईम
रॉंग साईडने येणाऱ्या भरधाव कारने दोन तरुणींना चिरडले
- अलीकडे हिट अँड रनच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मध्यप्रदेशातील इंदूर शहरात काल रात्री हिट अँड रनच्या घटनेत दोन तरुणींचा बळी गेला.
- भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या दिलेल्या धडकेत स्कूटीवरस्वार दोन तरुणी ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बीएमडब्ल्यूच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.
- गजेंद्र प्रताप सिंह (वय २८) असे या बीएमडब्ल्यू कारच्या ड्रायव्हरचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा रहिवासी आहे. सध्या तो इंदूरच्या सनसिटी येथे राहत होता, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कुंदन मंडलोई यांनी दिली.
- एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त केक देण्याची बीएमडब्ल्यूच्या ड्रायव्हरला घाई झाली होती. त्यामुळेच त्याने चुकीच्या दिशेने गाडी घातली होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अपघात झाल्यानंतर बीएमडब्ल्यू कारचा ड्रायव्हर खजाराना येथील घटनास्थळावरून कार घेऊन पळून गेला होता.
- इंदूर पोलिसांनी शोध मोहीम राबवून आरोपी ड्रायव्हरला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी तोमर (वय २४) आणि दीक्षा जादों (वय २५) या दोन तरुणी काल रात्री अकरा वाजता खजराना येथील गणेश मंदिर परिसात आयोजित जत्रेत सहभागी होऊन स्कूटीवरून घरी परतत होत्या.
- मात्र चुकीच्या दिशेने भरधाव येत असलेल्या बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या स्कूटीला समोरासमोर धडक दिली. धडकेमुळे दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघाता त्या गंभीर जखमी झाल्या. तरुणींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.