राज्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. गणपतीचे दर्शन घेऊन घरी परत जात असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिली.
या घटनेत पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम परिसराजवळ शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता घटना घडली आहे. घटनेनंतर डंपर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. अनिल आणि प्रिया यांचे आठच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
अनिल आणि प्रिया हे दोघे रात्री उशिरा गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या दुचाकीवरून भूगाववरून भुकूमकडे परतत होते. त्यावेळी एक डंपर चालक भरधाव वेगाने जात होता. या डंपरने सूर्यवंशीच्या दुचाकीला जोरात धडक दिली. पती-पत्नी दोघेही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. डंपर चालकाने या घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे या पती-पत्नींना उपचार न मिळाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.