पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली होती.
या हत्या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत आत्तापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता वनराज हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली असून हत्येच्यावेळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या शिवम आंदेकरच्या जिवाला धोका असून त्याला आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
वनराज यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांचा पुतण्या शिवम आंदेकरही त्यांच्यासोबत होता.
दोघेही सोबत उभे असतानाच हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर गोळ्या झाडल्या तसेच कोयत्याने हल्ला केला.
यावेळी हल्लेखोरांनी शिवमलाही मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रसंगावधान राखून तो पळाल्याने त्याचा जीव वाचला. या हल्ल्यातून वाचल्यानंतर शिवम याच्या जिवाला धोका आहे. त्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. या मागणीनंतर आता वनराज यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार असलेल्या शिवम याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.