राजकीय

फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा…

भाजपा प्रवेशावरून सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. मला फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिले होते, असे देखील या कार्यक्रमात खडसे म्हणाले.
खडसे म्हणाले की, मला एके दिवशी फडणवीस यांनी बोलावले होते. त्यावेळी आम्ही दोघेच होते. फडणवीस म्हणाले होते की, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी त्यांना म्हणालो की, देवेंद्रजी खरं सांगा, यापूर्वीदेखील तुम्ही मला अनेकदा सांगितले की हे करणार, ते देणार ते काही झाले नाही. त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. तुम्ही मला राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. त्यावर ते म्हणाले की, मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो. हा फडणवीसचा शब्द आहे. मात्र पुढे काय झाले मला माहिती नाही. पण फडणवीसांनी मला आश्वासन दिले होते. तसेच ही गोष्ट साधारण 2019 सालातील आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Related Articles

Back to top button