लाडकी बहीण खरंच स्वावलंबी बनली! थोडंस् डोकं लावलं अन्…
राज्य सरकारने अलीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेला सोलापूरसह अन्य भागात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, लाडक्या बहिणीचे आलेले पैसे काही महिलांनी स्वत:साठी खर्च केले तर काही महिलांनी व्यवसायात गुंतवले. पण एका लाडक्या बहिणीने थोडंस् डोकं लावून या योजनेच्या दीड हजार रुपयांत व्यवसाय सुरु करुन दहा हजार रुपये कमावले आहेत.
प्रणाली बारड असे या लाडक्या बहिणीचे नाव असून तिच्या खात्यात 17 तारखेलाच या योजनेचे पैसे जमा झाले. तिने या पैशांमधून आपला छोटासा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेत इन्टाग्रामवर ट्रेंडिग असलेल्या घुंगरु कडी तिने गणेशोत्सवासाठी खरेदी केले. त्यातूनच तिला ही कल्पना सुचल्याचे खुद्द प्रणालीने सांगितले.
सध्या गणेशोत्सव काळ सुरु आहे. अशातच गणरायाच्या आरतीसाठी वाजवल्या जाणाऱ्या घुंगरु कडीची मागणी जोरात होती. त्याचवेळी प्रणालीने घुंगरु कडीचा व्यवसाय सुरु केला. प्रणाली एवढ्यावरच थांबली नाही तर तिने घुंगरु कडी व्यवसायाची ब्रॅंडिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केली. गणेशोत्वाच्या तोंडावर घुंगरु कडी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्याने गणेशभक्तांनी ऑर्डरचा पाऊसच पाडला. फक्त ऑनलाईनच ग्राहक नाही तर घुंगरु कडीच्या विक्रीसाठी प्रणालीने मुंबईतील लालबाग मार्केट, स्वामी मठ आणि गौरीशंकर बाजारपेठेत नेऊनही विकल्या आहेत. अवघ्या काही दिवसांतच तिने दीड हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर दहा हजार रुपयांची कमाई केली. तिच्या खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले होते. त्यातील दीड हजार रुपयांची गुंतवणूक प्रणालीने केली होती.
जर तुमच्या अंगी काही कला असेल तर तुम्ही सोशल मीडियावर संपर्कातील लोकांना माहिती देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवून व्यवसाय वाढवू शकता. सोशल मीडियावर हिंमत दाखवून मार्केटिंगमध्ये उतरुन मराठी माणसाने व्यवसाय सुरु करायला हवा, असे आवाहन प्रणाली हिने केले आहे.