ऐन सणासुदीत तिहेरी हत्याकांड

राज्यात अलीकडे अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुलींवर आणि चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचारांमध्येही वाढ झाली आहे. दरम्यान पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ पोशिरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा निर्घृण खून केला आहे. ही धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील चिकन पाडा येथे घडली आहे. मदन पाटील (वय ३५),अनिशा पाटील (वय ३२) आणि विनायक पाटील (वय ८) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.
मदन यांच्यासह त्यांची पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह घरामागील ओढ्यात सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मदन यांची पत्नी सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. दरम्यान, पाटील कुटुंबाने स्वत:चे आयुष्य संपवले की त्यांची हत्या करण्यात आली, याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
नेरळच्या पोशिरमध्ये काल रात्री ही घटना घडली आहे. पण आज सकाळी ग्रामस्थांना नाल्यामध्ये एक मृतदेह आढळला. हा मृतदेह बाजूच्या घरातल्या मुलाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले, मग काही वेळाने मुलाच्या आईचा मृतदेहही नाल्यात तरंगताना दिसला. तर वडिलांचा मृतदेह घरात आढळून आला. मृतदेहांच्या शरीरावर काही जखमा असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
आई आणि मुलाचा मृतदेह नाल्यात तर मदन पाटील यांचा मृतदेह घरात सापडल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. या तिघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.