ब्रेकिंग! राज्यात नवा ट्विस्ट

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी महायुतीने तयारी सुरू केली आहे. बारामतीत कुणाला तिकीट मिळणार याचे उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मनात वेगळेच काही सुरू आहे, असे संकेत मिळू लागले आहेत. आज अजितदादा बारामतीत होते. यावेळी त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजितदादा भाषणात म्हणाले.
अजितदादा म्हणाले, मी आता 65 वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. आपण लाखांच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. यावेळी जमलेल्या लोकांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी मात्र अजितदादांनी घोषणा देणाऱ्यांना मध्येच थांबवले आणि मनातली खंत व्यक्त केली. जेथे पिकतं तिथे विकत नाही. मी सोडून दुसरा एखादा आमदार बारामतीकरांना मिळाला पाहिजे. म्हणजे त्या आमदाराची आणि माझ्या कारकिर्दिची तुलना तुम्ही करा.
अजितदादा पुढे म्हणाले, पद असेल तरच काम करील. नाही तर करणार नाही, अशी भूमिका अजिबात घेऊ नका. काही चुकत असेल तर जरूर मला सांगा. गावांतील ज्येष्ठ मंडळींना भेटा. त्यांचा आदर करा. संपूर्ण राज्यात मागील पाच वर्षात इतकी कामे झाली नसतील तितकी कामे एकट्या बारामतीत झाली, असे अजितदादा म्हणाले.