ब्रेकिंग! काँग्रेसच्या बड्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा

1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगलीतील सहभागासाठी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 41 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात दोषी ठरलेल्या सज्जन कुमार यांच्याविरोधात न्यायालयाने कठोर निर्णय घेतला आहे.
1 नोव्हेंबर 1984 रोजी सरस्वती विहार येथे जमावाने शीख समुदायावर हल्ला केला होता. या हिंसाचारात जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांना जिवंत जाळण्यात आले होते. जमावाने त्यांच्या घरात घुसून हत्या केली आणि नंतर लूटमार करत संपूर्ण घर जाळून टाकले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, सज्जन कुमार हे केवळ जमावाचा भाग नव्हते, तर त्यांनी हिंसक जमावाचे नेतृत्व केले होते. हे प्रकरण एका विशिष्ट समाजावर झालेल्या सामूहिक नरसंहाराशी संबंधित असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे सज्जन कुमार यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.