राजकीय

भाजपचे पुन्हा धक्कातंत्र

  1. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून भाजपचा एकही खासदार विजयी झाला नाही. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ‘छत्तीसगड पॅटर्न’नुसार प्रचार करत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. छत्तीसगडमधील 26 हून अधिक नेते मराठवाड्यातील जागांचा आढावा घेणार आहेत.
    भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 46 पैकी 25 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 16 जागा जिंकल्या. तर 9 जागांवर भाजपचा पराभव झाला. 2019 प्रमाणे यंदाही भाजप 25 जागांवर आपला दावा कायम ठेवणार आहे. दरम्यान, भाजपची मराठवाड्यातील स्थिती सुधारण्यासाठी छत्तीसगडमधील दोन माजी खासदार आणि 9 माजी आमदारांसह 26 ज्येष्ठ नेत्यांची फौज शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना या भागाची प्राथमिक माहिती देऊन पुढील रणनीतीबाबत मार्गदर्शन केले. या 26 नेत्यांवर आता मराठवाड्यात भाजपची स्थिती मजबूत करण्याची जबाबदारी असणार आहे.
    भाजपच्या वाट्याला येणाऱ्या एकेका मतदारसंघाची जबाबदारी या छत्तीसगडमधील 26 नेत्यांकडे असणार आहे. 20 सप्टेंबरपासून ते दोन महिने जनसंपर्क करणार आहेत. हॉटेलमध्ये न राहता कार्यकर्त्यांच्या घरी त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था असेल. 
  2. ते या दोन महिन्याच्या काळात मतदारसंघाचा आढावा घेऊन आपला अहवाल देणार आहेत. कोणता मतदारसंघ अधिक मजबूत आहे? कुठे उमेदवार बदलण्याची गरज आहे, स्थानिक मुद्दे काय आहेत? या सगळ्याचा अहवाल हे नेते देणार आहेत. त्यानुसार उमेदवारांची निवड होणार आहे.

Related Articles

Back to top button