क्राईम

पुण्यात मुळशी पॅटर्न; माजी नगरसेवकाचा मर्डर

राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. खून, दरोडे, बलात्कार, टोळी युद्ध या सारख्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली. आंदेकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत. आंदेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यातील मध्यवर्ती भागात खळबळ उडाली आहे.
आंदेकर हे काल रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात वनराज हे गंभीर जखमी झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आंदेकर यांच्यावर आधी गोळ्या झाडून नंतर चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चौकातील दिवे बंद असताना हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नाना पेठेत आंदेकर आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते. यावेळी जवळपास सात बाईकवरुन 14 ते 15 जण आले आणि आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button