क्राईम
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् दोन मुलांसमवेत विष खाल्ले

- एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. छत्तीसगड येथे एका काँग्रेस नेत्याने कुटुंबासह आत्महत्या केली आहे. जंजगीर-चंपा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथे काँग्रेस नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करून आत्महत्या केली. यामध्ये मोठ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर काँग्रेस नेते, त्यांची पत्नी आणि लहान मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत बिलासपूरच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे आज सकाळी तिघांचाही मृत्यू झाला.
पंचराम यादव (वय ६६), त्यांची पत्नी दिनेश नंदानी यादव (वय ५५), मुलगा नीरज यादव (वय २८), सूरज यादव (वय २५) अशी चौघांची नावे आहेत. या सर्वांनी शुक्रवारी एकत्र विष प्राशन केले होते. संपूर्ण कुटुंब कर्जामुळे त्रस्त असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणाला कळू नये म्हणून पंचराम त्यांनी पुढच्या दरवाजाला कुलूप लावले होते आणि मागच्या दाराने गेल्यावर त्यांनी आतून दरवाजाही बंद केला होता. शेजारी राहणारी मुलगी त्यांच्या घरी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. दोन-तीन वेळा फोन करूनही त्यांनी दार उघडले नाही. तेव्हा काहीतरी गैरप्रकार झाल्याच्या भीतीने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. शेजारी व नातेवाईक घरात गेले असता सर्वजण गंभीर अवस्थेत पडले होते. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर, तिघांवर उपचार सुरू असतांना आज सकाळी त्यांचाही मृत्यू झाला.