ब्रेकिंग! महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे कडक करणार- मोदी

कोलकाता आणि त्यापाठोपाठ बदलापूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांचा महाराष्ट्रभरात निषेध केला जात आहे. ठिकठिकाणच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. विरोधकांनी या घटनांवर आवाज उठवला आहे. ठिकठिकाणी याबाबत आंदोलने केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असताना त्यांनी या मुद्द्यावर बोलावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज जळगावातील ‘लखपती दिदी’ कार्यक्रमात बोलताना महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावर भाष्य केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका. त्यांचा हिशोब करा, असे मोदी म्हणाले.
महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजेत. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल, पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो आणि राजकीय पक्षांना सांगतो, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचे सरकार कडक कायदे करत आहेत, असे मोदी म्हणाले.