राजकीय

…म्हणून मला झेड प्लस सुरक्षा दिली असावी

केंद्र सरकारने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. राज्यातील घडामोडींचा विचार करून पवार यांची सुरक्षा वाढविण्यात येईल, असा अंदाज आधीच व्यक्त केला जात होता. पवार यांना सध्या राज्य सरकारकडूनही झेड प्लस सुरक्षा दिली जात आहे. आता केंद्र सरकारनेही त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर आता पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावरच शंका उपस्थित केली आहे. पवार यांनी काल नवी मुंबई येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, गृह विभागाचे अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला तीन जणांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती दिली. त्यांना मी अन्य दोन व्यक्तींची नावे विचारली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अशी नावे त्यांनी सांगितली. मला कशासाठी ही सुरक्षा दिली असेल, याची मला माहिती नाही. पण सध्या निवडणुकांचा काळ आहे. सगळीकडे फिरावे लागत आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती काढण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था केली असावी. या संदर्भात मी लवकरच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

Related Articles

Back to top button