क्राईम
पान टपरी चालकाकडून हप्ता वसुली ; व्हिडिओ व्हायरल केला, येथेच घात झाला
- पान टपरी चालकाकडून हप्ता वसुल करुन त्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुंडाने केला. हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी त्याला काही तासात उचलला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्यांची भाईगिरी चांगलीच उतरली. सोशल मीडियावर हाच भाई हात जोडून माफी मागू लागला.
- पुण्यात पिंपळे गुरव येथे महेंद्र यांची पानटपरी आहे. नक्या गायकवाड व त्याचे साथीदार हे पानटपरीवर येऊन हप्त्याची मागणी करत असे. आधी बरणीने तर कधी हाताने मारहाण करुन शिवीगाळ करत असत. महेंद्र पान टपरीवर असताना नक्या व त्याचे साथीदार आले. त्यांनी हप्त्याची मागणी करुन महेंद्रच्या अंगावर बरणी फेकून मारली. त्यानंतर मग हाताने मारहाण करत, तो म्हणाला, ही शेजारची टपरी माझ्यामुळे बंद आहे. पिंपळे गुरवमध्ये माझं नाव कोणालाही विचार, अशी धमकी देऊन तो पैसे घेऊन गेला. गेले कित्येक दिवस त्याची ही हप्तेखोरी चालू होती. पण, त्याच्या साथीदाराने आपली दहशत पसविण्यासाठी महेंद्रवर केलेल्या दादागिरीचा व्हिडिओ बनविला आणि तो सोशल मीडियावर टाकला अन तेथेच घात झाला. हा व्हिडिओ काही वेळात तुफान व्हायरल झाला.
- सांगवी पोलिसांच्या तपास पथकापर्यंत हा व्हिडिओ पोहचला. त्यांनी काही वेळातच नक्याला ताब्यात घेतले. त्याला आपला पोलिसी खाक्या दाखविताच त्याची भाईगिरी उतरली. जसा त्याने टपरीचालकाबरोबर व्हिडिओ केला होता. तसाच माफीनाम्या व्हिडिओ पोलिसांनी त्याला करायला लावला. नक्या या व्हिडिओमध्ये गयावया करत म्हणतो, मी काल टपरीवाल्याला मारले होते. त्याच्याकडून पैसे घेतले होते. डीबी पथकाने मला योग्य त्या भाषेत समजावून सांगितले आहे. मी यापुढे तसे करणार नाही, तुम्हीही करु नका.