क्राईम

सख्खा मित्र पक्का वैरी

कुख्यात गुंड हाजी सरवर शेख हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एकेकाळी जीवलग मित्र असलेला समीर शेख उर्फ प्रमोद वेळाकार याने इतर सहकाऱ्यांसह मिळून हाजीची हत्या केली. पैशाच्या वादातून हे हत्याकांड घडले. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून काही आरोपी फरार आहेत. 

हत्याकांडाची योजना नागपूर आणि दिग्रस येथे तयार करण्यात आली आहे. या हत्याकांडात आतापर्यंत समीर सरवर शेख (पूर्वाश्रमीचा प्रमोद वेळोकार उर्फ राजीव यादव रा. दिग्रस), निलेश उर्फ पिंटू ढगे (रा. नागपूर), श्रीकांत अशोक कदम (रा. दिग्रस), प्रशांत उर्फ पस्सी राजेंद्र मोटवाणी (रा. दिग्रस ), राजेश मुलकळवार (वय २५ रा. नकोडा) आणि अन्य एका आरोपीचा समावेश आहे. 
सहाव्या आरोपींची ओळख अद्याप पोलिसांनी सार्वजनिक केली नाही. समीर शेखची ओळख हाजीशी २००९ मध्ये झाली. दोघांनी मिळून गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला. अनेकदा ते दोघे मिळूनच तुरुंगात गेले. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईसुद्धा करण्यात आली. या गुन्हेगारी प्रवासात समीरचे एका मुस्लिम युवतीशी प्रेमसबंध जुळले. तिच्याशी विवाह करण्यासाठी तो प्रमोद वेळोकारचा समीर शेख झाला. त्याने धर्मपरिर्वतन केले.
हाजीने त्याला स्वतःच्या वडिलांचे नाव आणि आडनाव दिले. मध्यंतरी एका प्रकरणात दोघंही नागपूरच्या कारागृहात होते. हाजी जामीनावर सुटला आणि समीर आत राहिला. तेव्हापासूनच त्या दोघात वैरत्व निर्माण झाले.
समीरला हाजीच्या एका नाजूक प्रकरणाचा सुगावा लागला. त्यामुळे तो सुडाने पेटून उठला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने हाजीकडे त्यांच्या वाट्यातील पैशाची मागणी केली. हाजीने ते देण्यास टाळाटाळ केली. तडजोडीसाठी मध्यंतरी या दोघांची नागपूर येथे एक बैठकसुद्धा झाली. 

ती निष्फळ ठरली. त्यामुळे नाजूक प्रकरणाचा संताप आणि पैशाची मागणी नाकारल्याने समीरने हाजीला कायमचे संपवण्याचे ठरवले. दुसरीकडे हाजी आपल्याला मारणारच आहे, अशी माहिती समीरला मिळाली. दरम्यान ११ ऑगस्टला समीर चंद्रपुरात आला. तत्पूर्वी हाजीला संपवण्याची योजना दिग्रस इथं तयार केली. त्याने दिग्रस इथून श्रीकांत अशोक कदम, प्रशांत उर्फ राजेंद्र मोटवाणी, नागपुरातून नामदेव ढगे आणि हाजीच्या नकोडा गावातून राजेश मुलकवार यांना सोबत घेतले. हे सर्व चंद्रपुरातील एका लॅाजमध्ये थांबले. हाजीवर हल्ला होणार असल्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली. पोलिसांनी मारेकऱ्यांसाठी शोध मोहीम राबवली. परंतु पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच समीर आणि त्याचे साथीदार हाजीपर्यंत पोहचले.
बिनबा गेट परिसरातील शाही दरबार या हॅाटेलमध्ये हाजी मित्रांसोबत जेवण करत असताना दुपारी त्याच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. 
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हाजीवर या पाचही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. हाजीला चार गोळ्या लागल्या. मात्र, त्याचा मृत्यू धारदार शस्त्रामुळे झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला. या हल्यानंतर पाचही आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले. आणखी एका आरोपीला रात्री अटक करण्यात आली. 

Related Articles

Back to top button